Saturday, March 8, 2014

मानवा काय तुझ्या हाती?

असहाय्य तू ,हतबल तू ,हताश तू
मानवा काय तुझ्या हाती?
अवकाळी पाऊस  नि अकाली मृत्यू
अवेळीच प्रगटती,
अवचितच अवतरती.
विनाकारण येती !
बेहिशोबी वेदना देवूनी जाती ……
मानवा काय तुझ्या हाती ?
हिशोब या बेमोसमाचा करता ….
विध्वंसक खुणा डोळ्या सलती
विदीर्ण जगणे मागे उरती.
ह्रदयाचे पिळवटने नि,
आसवांचे झरणेच शिल्लक राहती ……
मानवा काय तुझ्या हाती?
असहाय्य तू , हतबल तू, हताश तू …… 

Thursday, February 6, 2014

bhavna

भावनांना मरताना जाणीले
तिला मारतानाही पाहीले
दूर होताना तिच्यापासून ,
हतबल मनाचे हुंदकेही ऐकले
अंत्ययात्रेत तिच्या ,
एकाकी मनाचे आक्रंदनही पाहीले 
अबोल मन जिंकूनही हारले ……

Tuesday, February 4, 2014

अनोळखी होवुनी,
स्वतः ने  स्वतः ला  नव्याने भेटावे
मनाच्या दारातून डोकावून पहावे
भावनांच्या कवडशामध्ये उभा रहावे
त्या भावनांना भेटावे
मर्मबंधाचे बंध सोडावे
हसतच जगणे असे झेलावे
एका नव्या पहाटेचे ,
स्वागत असे करावे …
 

Thursday, January 9, 2014

lene...

घडवताना देव विसरला
किंवा नशीबाचे देणे
म्हणून असे अपंगाचे लेणे
ना दुसऱ्यांना दोष देणे
सुखात जगतोय जिणे ….
सुंदर जिवनात आत्मविश्वासाची साथ,
सोबत प्रेमाचा हात ,
करुनी परिस्थितीवर मात,
सुखात जगतोय जिणे …
तुम्ही तसे आम्ही ,
सामान्य -साधारण ,
तुम्ही बनवताय आम्हास 'विशेष '!
करून देताय उणीवेची जाणीव
नि सहानुभूतीचा कहर ,
परंतु ,
नको आम्हास सहानुभूती
माना तुमच्यासारखेच
नि द्या हिच अनुभूती
कारण,
सुखात जगतोय जिणे ….
जाणिले या जगती
सुदृढ शरीराचे विध्वंसक जिवन
नि सुंदर जिवनाचे नकारात्मक जिणे
जिवन अपंग तरीही सुदृढ ?
मानसिकताच निराळी !…
सकळांना सांगणे असे ,
सुखात जगतोय जिणे ……

Thursday, December 26, 2013

ha khel savlyanch..

अस्तित्व सावलीचे प्रकाशामुळे
अंधारातील प्रकाशाच्या अस्तित्वासाठी,
हवी साथ ज्योतीची  . …
अखंड तेवत ठेवूनिया ज्योत ….
तदनंतर,
ना संपेल कधीही
हा खेळ सावल्यांचा

Sunday, November 17, 2013

savali....

मे महिन्यातील दिवस असतात. ती माहेरी येते. कॉलनीत 
प्रवेश करता क्षणी तिला जाणवला ,तो थंडावा. ती वर पाहते.
कॉलनीतील दोन्ही बाजूंची झाडे उंचच उंच गेलेली असतात .
वारा आपल्याच मस्तीत वाहत होता. आणि त्यामुळे झाडांच्या
पानांच्या सळसळीतून एक प्रकारचा नाद निर्माण झाला होता.
दोन्ही बाजूने फांद्या एकमेकींशी हात गुंफून जणू काही फुगड्या 
खेळताना भासल्या. त्यांच्या फुगड्यामुळे  सूर्यकिरणांना रस्त्यावर
येण्यास वावच मिळत नव्हता. त्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्याला
थंडावा जाणवे. आणि अपसूकच मुखोद्गार बाहेर पडे,'खूप छान
वाटले .उन्हामुळे अंगाची लाही लाही झाली होती. '
               ती घरी पोहचते. घरासमोरील हिरवी  लॉन नि हिरवी
झाडे पाहून तिच्या डोळ्यांना आणखीनच थंडावा जाणवला . सकाळी
सकाळी पक्ष्यांची किलबिल कानावर पडली . ती लॉनवर आली .
वारा पिंगा घालत होता,तर फांद्या कधी फुगड्या तर कधी
झिम्मा खेळत होत्या. पानांची सळसळ,झाडांच्या फांद्यांना
भेदून धरेला भेटण्यास आतुरलेली कोवळी सूर्य किरणे  पाहून
तिच्या मनात एक आनंदाची लहर निर्माण झाली. सुख म्हणजे
तरी काय ?हेच असावे.
             तिच्या मनात आले,'आज तिच्या वडिलांना जावून
जवळजवळ १२ -१३ वर्षे झाली. त्यांनीच लावलेली हि झाडे
होती . जी मनाला शांत करत होती . '
          कॉलनीत  शिरतानाच तिला एखाद्या पवित्र स्थळाच्या
प्रथम पायरीचे दर्शन घेतल्याची भावना झाली . पवित्र ठिकाणी
गेल्यानंतर मिळणाऱ्या मनःशांती पेक्षाही जास्त मनःशांती येथे
मिळाली.
               संपूर्ण कॉलनीमध्ये झाडे लावून ती वाढवण्यास वडिलांनी
प्रोत्साहन दिले होते. घरासमोरील आणि आजूबाजूची काही झाडे
 खूप मेहनत करून त्यांनी वाढवली होती. वडील गेले तेव्हा ती झाडे
जास्त मोठी झाली नव्हती. पण आज त्या छोट्या झाडाचे मोठमोठ्या
वृक्षात रुपांतर झाले होते .
               तीच झाडे भर उन्हात स्वतः तळत होती. आणि इतरांना
गारवा देत होती. वडिलांना भेटण्याची तृप्ती तिला मिळाली. न कळत
प्रत्येकाच्या मनात एक आश्वासक साथीची गरज असते. तीच
आश्वासकता या झाडांच्या सावलीत तिला जाणवली. जणूकाही
झाडे तिला सांगत होती,'कडकडीत उन्हाची कशाला काळजी
करतेस?मी आहे न! तू फक्त आनंदी राहा…. '