Thursday, December 26, 2013

ha khel savlyanch..

अस्तित्व सावलीचे प्रकाशामुळे
अंधारातील प्रकाशाच्या अस्तित्वासाठी,
हवी साथ ज्योतीची  . …
अखंड तेवत ठेवूनिया ज्योत ….
तदनंतर,
ना संपेल कधीही
हा खेळ सावल्यांचा

Sunday, November 17, 2013

savali....

मे महिन्यातील दिवस असतात. ती माहेरी येते. कॉलनीत 
प्रवेश करता क्षणी तिला जाणवला ,तो थंडावा. ती वर पाहते.
कॉलनीतील दोन्ही बाजूंची झाडे उंचच उंच गेलेली असतात .
वारा आपल्याच मस्तीत वाहत होता. आणि त्यामुळे झाडांच्या
पानांच्या सळसळीतून एक प्रकारचा नाद निर्माण झाला होता.
दोन्ही बाजूने फांद्या एकमेकींशी हात गुंफून जणू काही फुगड्या 
खेळताना भासल्या. त्यांच्या फुगड्यामुळे  सूर्यकिरणांना रस्त्यावर
येण्यास वावच मिळत नव्हता. त्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्याला
थंडावा जाणवे. आणि अपसूकच मुखोद्गार बाहेर पडे,'खूप छान
वाटले .उन्हामुळे अंगाची लाही लाही झाली होती. '
               ती घरी पोहचते. घरासमोरील हिरवी  लॉन नि हिरवी
झाडे पाहून तिच्या डोळ्यांना आणखीनच थंडावा जाणवला . सकाळी
सकाळी पक्ष्यांची किलबिल कानावर पडली . ती लॉनवर आली .
वारा पिंगा घालत होता,तर फांद्या कधी फुगड्या तर कधी
झिम्मा खेळत होत्या. पानांची सळसळ,झाडांच्या फांद्यांना
भेदून धरेला भेटण्यास आतुरलेली कोवळी सूर्य किरणे  पाहून
तिच्या मनात एक आनंदाची लहर निर्माण झाली. सुख म्हणजे
तरी काय ?हेच असावे.
             तिच्या मनात आले,'आज तिच्या वडिलांना जावून
जवळजवळ १२ -१३ वर्षे झाली. त्यांनीच लावलेली हि झाडे
होती . जी मनाला शांत करत होती . '
          कॉलनीत  शिरतानाच तिला एखाद्या पवित्र स्थळाच्या
प्रथम पायरीचे दर्शन घेतल्याची भावना झाली . पवित्र ठिकाणी
गेल्यानंतर मिळणाऱ्या मनःशांती पेक्षाही जास्त मनःशांती येथे
मिळाली.
               संपूर्ण कॉलनीमध्ये झाडे लावून ती वाढवण्यास वडिलांनी
प्रोत्साहन दिले होते. घरासमोरील आणि आजूबाजूची काही झाडे
 खूप मेहनत करून त्यांनी वाढवली होती. वडील गेले तेव्हा ती झाडे
जास्त मोठी झाली नव्हती. पण आज त्या छोट्या झाडाचे मोठमोठ्या
वृक्षात रुपांतर झाले होते .
               तीच झाडे भर उन्हात स्वतः तळत होती. आणि इतरांना
गारवा देत होती. वडिलांना भेटण्याची तृप्ती तिला मिळाली. न कळत
प्रत्येकाच्या मनात एक आश्वासक साथीची गरज असते. तीच
आश्वासकता या झाडांच्या सावलीत तिला जाणवली. जणूकाही
झाडे तिला सांगत होती,'कडकडीत उन्हाची कशाला काळजी
करतेस?मी आहे न! तू फक्त आनंदी राहा…. '

Sunday, October 6, 2013

वर्ग विभाजन

शाळेत सोयीसाठी अ,ब,क… अशी वर्ग विभागणी करत.
यात मित्रमैत्रिणींची पण विभागणी होत असे. शाळेत जाणे-
येणे,मधली सुट्टी या वेळेत त्यांची भेट होत असे. त्यामुळे
सर्व वर्गातील मुलामुलींची ओळख असे. जे सतत सोबत
असत,त्यांना या वर्ग विभागणीमुळे काही फरक पडत
नसे. परंतु या वर्ग विभागणीचा परिणाम मुलांच्या
मनावर नेहमीच राहतो कि काय?असा प्रश्न पडतो.
कारण नुकतीच एक घटना घडली नि या प्रश्नाने
डोके वर काढले.
         जवळ जवळ २५ वर्षानंतर,संसाराच्या व्यापातून
प्रत्येकाला फुरसत मिळाली नि शाळेच्या सवंगड्यांची
आठवण झाली . नंतर वर्गमित्रांची शोधाशोध सुरु झाली.
एकाने पुढाकार घेवून ब-याच मित्रमैत्रिणींची यादी तयार
केली. सर्वानुमते 'अ' वर्गाचे गेट-टुगेदर करण्याचे ठरवले.
अ आणि ब वर्गातील ब-याच मुली एकमेकींच्या संपर्कात
असतात. ब वर्गातील शितल ब-याच जणींच्या संपर्कात
असते.शितल कडून अ वर्गातील दोघी-तिघींचा फोन नंबर
घेतला गेला .
          पुढे एक दीड महिन्यानंतर त्यांचे गेट टुगेदर झाले.
तिला वाईट वाटले,कि तिच्याकडून फोन नंबर घेवून
तिलाच बोलावलेले नसते. ज्या ठिकाणी गेट टुगेदर
असते. त्याच गावात प्रेरणा राहत असते. तिलादेखील
बोलावलेले नसते. प्रेरणा अ वर्गातील ब-याच जणांच्या
संपर्कात असते. तिला आमंत्रण नसल्यामुळे तिलाही
खूप वाईट वाटते. ती शीतलला फोन करून म्हणते,
'बघ गं,आपल्याला नाही बोलावले. यांच्या मनातून
'अ' ,'ब' वर्ग गेलाच नाही का ?काळ खूप पुढे आलाय.
आज प्रत्येकाचे आपापल्या क्षेत्रामध्ये चांगले बस्तान
आहे. तरीही हे 'अ','ब' का?'  

Saturday, October 5, 2013

शॉपिंग



'शॉपिंग'हा  स्त्रियांचा आवडता विषय. अशाच एका 'शॉपिंग'चा किस्सा.
वनिता,मीना,वैशाली नि आणखी दोन तीन जोडपी सहलीसाठी जातात.
सहल सात-आठ दिवसांची असते.
   सहलीचा पहिला दिवस, म्हणजे खरेदीचा उत्साह जोरात. त्या भागातील
प्रसिध्द असलेली वस्तू खरेदी करण्यावर जास्त भर . रेशीम धाग्यांनी
विणलेली कुशन कव्हर्स वनिताच्या मनात घर करून बसले.मुक्कामाच्या
 प्रत्येक ठिकाणी तिने त्याच्या किमतीची विचारणा केली . प्रत्येक ठिकाणी
एका कुशन कव्हरची किंमत   ३५० ते ४५० रु. अशीच असते . पाचव्या दिवशी
एका ठिकाणी तिने ३००रु.ला एक या प्रमाणे कुशन खरेदी  केले.
       कोणी काय खरेदी केले ? यावर रात्रीच्या वेळी चर्चा झाली. त्यावेळी
सर्वांनाच  ते कव्हर्स आवडले .वैशाली नि मीनाने  ते कव्हर्स घेण्याचे ठरवले .
परंतु पुढील कोणत्याही ठिकाणी तशी कव्हर्स दिसली नाहीत .
            शेवटच्या मुक्कामी हॉटेलमधील एका शॉपमध्ये त्यांना ती दिसली.
त्याची किंमत होती, ५०० रु. प्रती नग .  'घेवू कि नको' म्हणून त्या दोघी
विचारात पडल्या.  ती घेण्याची त्यांची जबरदस्त इच्छा असते. मीना म्हणते,
'अगं ,आपण इथे जर हे कव्हर्स घेतले नाहीत तर आपल्याला ते सारखे आठवत
राहतील. न घेतल्याची चुटपूट मनाला लागेल. त्याचा विचार करण्यापेक्षा
त्याची खरेदी केलेलीच चांगली .'चेकआऊट करून विमानतळावर जायचे असते .
त्या दोघी त्या शॉप मध्ये जातात. जाताना वैशाली म्हणते,'अगं ,पैसे देताना
आमचे हे तर मला रागातच म्हणाले,आणखी तुझी शॉपिंगच संपली नाही का?
तरी मी त्यांना त्याची खरी किंमत सांगितलीच नाही. वनिताला सांगावे लागेल
कि, त्याची किंमत ५०० रु. च सांग म्हणून. '
                   वनिता दिसल्यानंतर वैशाली तिला म्हणते,'वनिता,मी  ते
कव्हर्स घेतले. पण ५०० रु. ला एक पडले. आमच्या यांच्या समोर किमतीचा
विषय काढू नकोस.' वनिता हसते,नि थट्टेत म्हणते,'अगं,मी तुला ४००
रुपयातच दिले असते. कारण ते मला ३००रुपयालाच पडले .'
यावर वैशाली म्हणते,'जावू दे ग. हौस भारी  त्याला कोण काय करी!'
अशा प्रकारे ३०० रु. ची वस्तू ५०० रु. ला खरेदी करून शॉपिंगचा
शेवट होतो . 

Friday, August 16, 2013

ठराविक काळ,इच्छापुर्तिचा …
म्हणजे आपलाच
काळ सरतो,
मागे राहतात खुणा
खुणा जपत,
आयुष्य सरकते
पुन्हा तो काळ येण्याची वाट बघत ….

Tuesday, July 30, 2013

समाज आणि भ्रष्टाचाराचे प्रातिनिधिक रूप …
फुलाचे उमलणे,
त्याचे जगणे असते. 
मधमाशांनी मध चाखणे,
भुंग्याने त्याच्याभोवती गुणगुणणे,
फुलपाखराचे बागडणे,
हा निसर्गनियम  … 
पण…. 
त्याच फुलाची पाकळी न पाकळी खाणे ,
हा कसला निसर्गनियम ?

Friday, July 26, 2013

'पाटील'



'पाटील' नावाला उधाण आले,
राजकारणामुळे हे नाव 'रोषण'झाले.
समाजाला 'पाटील' चा संसर्ग झाला,
नि तो सुसाट वेगाने पसरू लागला.
कित्येकाच्या नावापुढे 'पाटील' झळकू लागले.
'पाटील'चे आडनाव बंधू पावलोपावली भेटू लागले.
समाजात 'पाटील'ची चलती सुरु झाली.
चांगल्या-वाईट प्रसंगी,
'अहो,आम्ही पण पाटीलच की !',
असे 'नसलेले'पाटील म्हणू लागले.
'पाटील-पाटील'म्हणून जवळीक साधू लागले.
आणि….
मूळ 'पाटील ' मात्र कपाळावर हात मारून ,
मूग गिळून  गप्प बसू लागले ….

Wednesday, July 17, 2013

मोकळा श्वास….

काळ्याकुट्ट मेघांनी भरलेल्या आभाळा,
जलधारांना का कोंडतोस?
का स्वतःचा श्वास गुदमरून टाकतोस?
रिमझीम बरसून का पाझरतोस
असा का थोडा थोडा झुरतोस?
मेघांना वाट दाखवून,
कोंडलेल्या जलधारांना सरसरू दे
आणि … 

गुदमरलेल्या श्वासाला मोकळे होवू दे …… 

पाऊस.

चार दिवसांपासून,
रिमझीम पाऊस.  
सर्द भिंती.  
कुंद हवा.  
बंदिस्त. … 
निसर्गाचा खेळ, 
नि,
न जाणारा वेळ…. ?

मोह होतो….

मोह होतो…. 
१]हॉटेलमध्ये थांबल्यानंतर चेक आऊट करताना,
बाथरूम किट चोरण्याचा …. 
२]हॉटेलमध्ये जेवल्यानंतर टुथपिक व बडीसोप 
जास्त घेण्याचा … 
३]खरेदी केलेल्या वस्तूपेक्षा त्याच्यासोबत येणा-या 
carybagचा …. 
४]भाजीवाल्याशी वाद घालून  एक रुपया वाचवण्याचा …. 
५]दुकानदाराशी गोड बोलून डिस्कावुंट मिळवण्याचा…. 
६]महागड्या गाडीतून प्रवास करताना टोलनाक्यावर 
वाद घालून पैसे वाचवण्याचा …. 
मोह होतो….