Sunday, October 6, 2013

वर्ग विभाजन

शाळेत सोयीसाठी अ,ब,क… अशी वर्ग विभागणी करत.
यात मित्रमैत्रिणींची पण विभागणी होत असे. शाळेत जाणे-
येणे,मधली सुट्टी या वेळेत त्यांची भेट होत असे. त्यामुळे
सर्व वर्गातील मुलामुलींची ओळख असे. जे सतत सोबत
असत,त्यांना या वर्ग विभागणीमुळे काही फरक पडत
नसे. परंतु या वर्ग विभागणीचा परिणाम मुलांच्या
मनावर नेहमीच राहतो कि काय?असा प्रश्न पडतो.
कारण नुकतीच एक घटना घडली नि या प्रश्नाने
डोके वर काढले.
         जवळ जवळ २५ वर्षानंतर,संसाराच्या व्यापातून
प्रत्येकाला फुरसत मिळाली नि शाळेच्या सवंगड्यांची
आठवण झाली . नंतर वर्गमित्रांची शोधाशोध सुरु झाली.
एकाने पुढाकार घेवून ब-याच मित्रमैत्रिणींची यादी तयार
केली. सर्वानुमते 'अ' वर्गाचे गेट-टुगेदर करण्याचे ठरवले.
अ आणि ब वर्गातील ब-याच मुली एकमेकींच्या संपर्कात
असतात. ब वर्गातील शितल ब-याच जणींच्या संपर्कात
असते.शितल कडून अ वर्गातील दोघी-तिघींचा फोन नंबर
घेतला गेला .
          पुढे एक दीड महिन्यानंतर त्यांचे गेट टुगेदर झाले.
तिला वाईट वाटले,कि तिच्याकडून फोन नंबर घेवून
तिलाच बोलावलेले नसते. ज्या ठिकाणी गेट टुगेदर
असते. त्याच गावात प्रेरणा राहत असते. तिलादेखील
बोलावलेले नसते. प्रेरणा अ वर्गातील ब-याच जणांच्या
संपर्कात असते. तिला आमंत्रण नसल्यामुळे तिलाही
खूप वाईट वाटते. ती शीतलला फोन करून म्हणते,
'बघ गं,आपल्याला नाही बोलावले. यांच्या मनातून
'अ' ,'ब' वर्ग गेलाच नाही का ?काळ खूप पुढे आलाय.
आज प्रत्येकाचे आपापल्या क्षेत्रामध्ये चांगले बस्तान
आहे. तरीही हे 'अ','ब' का?'  

Saturday, October 5, 2013

शॉपिंग



'शॉपिंग'हा  स्त्रियांचा आवडता विषय. अशाच एका 'शॉपिंग'चा किस्सा.
वनिता,मीना,वैशाली नि आणखी दोन तीन जोडपी सहलीसाठी जातात.
सहल सात-आठ दिवसांची असते.
   सहलीचा पहिला दिवस, म्हणजे खरेदीचा उत्साह जोरात. त्या भागातील
प्रसिध्द असलेली वस्तू खरेदी करण्यावर जास्त भर . रेशीम धाग्यांनी
विणलेली कुशन कव्हर्स वनिताच्या मनात घर करून बसले.मुक्कामाच्या
 प्रत्येक ठिकाणी तिने त्याच्या किमतीची विचारणा केली . प्रत्येक ठिकाणी
एका कुशन कव्हरची किंमत   ३५० ते ४५० रु. अशीच असते . पाचव्या दिवशी
एका ठिकाणी तिने ३००रु.ला एक या प्रमाणे कुशन खरेदी  केले.
       कोणी काय खरेदी केले ? यावर रात्रीच्या वेळी चर्चा झाली. त्यावेळी
सर्वांनाच  ते कव्हर्स आवडले .वैशाली नि मीनाने  ते कव्हर्स घेण्याचे ठरवले .
परंतु पुढील कोणत्याही ठिकाणी तशी कव्हर्स दिसली नाहीत .
            शेवटच्या मुक्कामी हॉटेलमधील एका शॉपमध्ये त्यांना ती दिसली.
त्याची किंमत होती, ५०० रु. प्रती नग .  'घेवू कि नको' म्हणून त्या दोघी
विचारात पडल्या.  ती घेण्याची त्यांची जबरदस्त इच्छा असते. मीना म्हणते,
'अगं ,आपण इथे जर हे कव्हर्स घेतले नाहीत तर आपल्याला ते सारखे आठवत
राहतील. न घेतल्याची चुटपूट मनाला लागेल. त्याचा विचार करण्यापेक्षा
त्याची खरेदी केलेलीच चांगली .'चेकआऊट करून विमानतळावर जायचे असते .
त्या दोघी त्या शॉप मध्ये जातात. जाताना वैशाली म्हणते,'अगं ,पैसे देताना
आमचे हे तर मला रागातच म्हणाले,आणखी तुझी शॉपिंगच संपली नाही का?
तरी मी त्यांना त्याची खरी किंमत सांगितलीच नाही. वनिताला सांगावे लागेल
कि, त्याची किंमत ५०० रु. च सांग म्हणून. '
                   वनिता दिसल्यानंतर वैशाली तिला म्हणते,'वनिता,मी  ते
कव्हर्स घेतले. पण ५०० रु. ला एक पडले. आमच्या यांच्या समोर किमतीचा
विषय काढू नकोस.' वनिता हसते,नि थट्टेत म्हणते,'अगं,मी तुला ४००
रुपयातच दिले असते. कारण ते मला ३००रुपयालाच पडले .'
यावर वैशाली म्हणते,'जावू दे ग. हौस भारी  त्याला कोण काय करी!'
अशा प्रकारे ३०० रु. ची वस्तू ५०० रु. ला खरेदी करून शॉपिंगचा
शेवट होतो .