Thursday, June 26, 2014

ovi

पहिली माझी ओवी गं ,
भरून येणाऱ्या आभाळाला….
पाझर रे झरझर,
न्हावू  घाल धरणीला ….
                         दुसरी माझी ओवी गं,
                         धावणाऱ्या वाऱ्याला …
                         थांब थोडं निवाऱ्याला,
                          पाझरू दे ढगाला ……
तिसरी माझी ओवी गं,
काळ्या धरणी मातेला ……
आसुसली ती,
पावसाच्या भेटीला……
                       चौथी माझी ओवी गं,
                       दगा देणाऱ्या नशिबाला ….
                       आशेला धरून वेठीस ,
                       निराशा पदरात ……
पाचवी माझी ओवी गं ,
चिंतातूर मनाला…
धीर धर थोडासा ,
वेळ लागेल पावसाला……
                  सहावी माझी ओवी गं ,
                  कष्ट करणाऱ्या जिवाला ….
                  राब राब राबून,
                   अर्पण केले जिवनाला …             

Monday, June 23, 2014

मन हे बावळे
खोट्या प्रतिष्ठेचे डोहाळे
सारे दिखाव्याचे सोहळे
आले ते मावळे
गेले ते कावळे
नको कोणाचे सोवळे
न मिळे मोती- पोवळे
हाती उरती कोहळे …….

Wednesday, June 18, 2014

tildan

 पावसाच्या अनेक रंगाच्या आठवणी प्रत्येकाच्या मनात ठाण मांडून असतात.
 पावसाचा एक रंग तिच्याही मनात दडलेला असतो. पावसाची आठवण ती विसरूच
शकत नाही. तिच्यासाठी पाऊस आणि ती आठवण हे एक समीकरणच झाले आहे .
                      जून महिन्याचा मध्य. पावसाची सुरुवात. त्यावेळी त्यांची बदली
महाबळेश्वरला असते. महाबळेश्वरला मेच्या दुसऱ्या आठवड्यातच पावसाची
सुरुवात  होते. जूनमध्ये त्याचा भर थोडा जास्तच असतो. संतत धार असते.
गुरुवारी दुपारी एकची वेळ असते. फोन येतो. नवऱ्याचे फोन वर बोलणे होते.
तिला सांगण्यात येते कि,' तिच्या वडिलांची तब्येत बरी नाही म्हणून तिकडे
जावे लागेल.दोन -सव्वा दोनच्या दरम्यान ड्रायव्हरला सोबत घेऊन ते निघतात.
वाईपर्यंतच पाऊस असेल असे वाटले. पण त्या दिवशी पावसाने मनावर घेतलेले
दिसत होते. अंगात आल्याप्रमाणे तो वेड्यासारखा बरसत होता.भीती वाटावी इतका
तो पडत होता . धुंवाधार पावसात  ते रस्ता कापत निघाले.पाऊस त्यांना आडवत
होता . एखाद्या आज्ञाधारक शिष्याप्रमाणे त्याने सोबत केली. कसरत करतच
ड्रायव्हर गाडी चालवत असतो.घरून निघताना शेजारच्या काकांकडे निघाल्याचा
निरोप दिलेला असतो. landlineचा वापर असल्यामुळे ते  कोठे आहेत  हे माहेरी
लवकर समजत नव्हते. तरीही पी.सि. ओ . वरून ते त्यांना सांगत.
                   खंडाळ्याला जेवण केले. का कोणास ठाऊक पण तिची जेवणाची
इच्छाच झाली नाही. इतरांनी जेवण केले. नि ते पुढे निघाले.
                रात्री सात आठची वेळ असेल. एक चौफुली लागली. पावसामुळे दिशादर्शक
पाटी  दिसलीच नाही. आणि रस्ता चुकला. कच्चा रस्ता लागल्यावर,रस्ता चुकल्याचे
 लक्षात आले. शेत वस्तीवरील एकाला विचारले. तर तो म्हणाला,'तुमचा रस्ता
दहा बारा किलोमीटर मागंच गेला. तुम्ही विरुध्द दिशेला आलात.' गाडी मागे फिरवली.
 नि नेहमीच्या वाटेला लागले.
         तिचे माहेर  जवळ आल्यानंतर तिला सांगितले कि, तिच्या वडिलांचे निधन
झाले आहे. तिला समजले नि ती सुन्न झाली. 'असे कसे झाले?कालच तर मी त्यांच्याशी
बोलले.' नुकतीच ती माहेरी जावून राहून आलेली असते.तिची विचारशृंखला सुरु झाली.
आजूबाजूचे जगच विसरली. घरी कोणीच नसते. सारेच त्यांच्या मुळगावी गेलेले असतात.
तिथे जाण्यासाठी निघतात. इथे पाउस नसतो.
                    गावाच्या जवळ एक t.point असतो. दिशादर्शक पाटी नसते.म्हणून तिला
रस्ता विचारतात. ती समोर बघते. तर तिला सारा परिसर अनोळखी भासतो. वहिवाटीचा
रस्ता, पण तिला तो आठवतच नाही. पुन्हा रस्ता चुकतो.थोडे अंतर गेल्यावर लक्षात येते.
वापस फिरून ते गावच्या वाटेला लागतात. यावेळी पहाटेचे चार वाजत आलेले असतात .
                  गावात जाण्या अगोदर वडिलांचा शेत मळा  लागतो. त्या मळ्यातच
अंत्यविधीचा कार्यक्रम पार पडलेला असतो. तिथे फक्त थोड्या ज्वाला नि धगधगते
निखारेच दिसले. ते गावात येतात. सगळीकडे सामसूम झालेले असते. त्यांना
येण्यास उशीर झालेला असतो.पोहचण्यासाठी आठ नऊ तासा ऐवजी तेरा चौदा तास
लागतात. ती तिथे येते नि पावसाला सुरुवात होते. तिने शोधक नजरेने सगळीकडे
पाहिले.सारे नातेवाईक दिसले. पण भेटण्याची इच्छा असणारी व्यक्ती मात्र  तिला
दिसत नव्हती.
            तिथे समजते, कि खूपच दुरून लोकं आलेली  असतात. वेळ खूप झालेला
असतो. वडील दुपारी एक वाजताच गेलेले असतात. पावसाचे दिवस. आभाळ
भरून आलेले असते. पावसामुळे नि दुरून आलेल्या लोकांना किती वेळ ताटकळत
ठेवणार! म्हणून रात्री दोन वाजेच्या आसपास अंत्यविधीचा कार्यक्रम उरकलेला
असतो. नातेवाईक म्हणू लागले, हिचे तीळदानच नव्हते.
             ज्यांना समजले ते गावी आले.अलोट गर्दीत त्यांना अखेरचा निरोप दिला.
त्या आफाट गर्दीत नव्हती ती त्यांची लाडकी लेक. तिळदानच नव्हते ना!नशिबाने
एकतर आघात  दिला  नि त्या आघातावरच  पुन्हा घाव  घातला .
               ती विचार करते, असे कसे होते ना! ज्या मुलीवर वडिलांचे सर्वाधिक
प्रेम असते,सदोदित सोबत असणाऱ्या त्या मुलीला त्यांना अखेरचा निरोपही
देता  येवू नेये?म्हणतात कि,तिळदान असेल तर परदेशातील माणसे देखील
 अंत्यविधीला उपस्थित राहतात नि तिळदान नसेल तर जवळ असलेली
माणसे येवू शकत नाहीत. असेच घडले होते .
             आठवनींना ये म्हणावे लागत नाही. नि जा म्हणून सांगितले तर
जात नाहीत. वादळी  पावसाची एक सल तिच्या मनात घर करून राहते.
प्रत्येक वादळी पावसात तिची खपली निघते. नि जखम पुन्हा वेदना
देवून जाते……

Saturday, June 14, 2014

pavsha

गेले पाच -सहा दिवस पावशाला ओरडताना ऐकले . भरून  आलेले आभाळ
आणि पावशाचे ओरडणे . वाटले कि,आता पाऊस येणारच. पण नाही . तो
आलाच नाही. त्याचे नि पावशाचे गेल्या काही दिवसात गणितच चुकलेय.
पावशाला विचारले,'का ओरडतोस असा? तुझे नि पावसाचे काहीतरी
बिनसलेले दिसतेय! तुझी आर्त साद ऐकून देखील तो धावून येत नाही.'
        यावर पावशाने एक आनंदात शीळ घातली. म्हणाला ,'तुम्ही
मला वेड्यात काढताय ना ! पावसाला साद घालतोय नि पाऊस पाठ
फिरवतोय. तुम्हाला माझी आर्त साद नि पावसाचे न येणे दिसत असेल,
पण आमच्या दोघातील भावनिक संबंध जाणवले नसतील . मी साद
घालतो कारण मला त्याच्या अस्तित्वाची जाणीव होते वारा  आमचा
वैरी. तो अडथळा आणतो. पण आमच्या भावनिक नात्यापुढे  तोही
टिकत नाही . पाऊस येणारच,याची मला खात्री असते. उशीर होतो
पण तो येतो. '  
                   अस्तित्वाची जाणीव पावसाच्या
                    आनंदे शीळ घाली पावशा
                    आर्त साद त्याची पावसापर्यंत पोहचेना
                    वारा त्यांचा वैरी
                    मिलाप त्यांचा होईना
                    विश्वास त्याला पाऊस येण्याचा
                    आत्मविश्वासाने साद घाली
                    पाहता त्यांचे अतूट नाते,
                    वारा माघार घेई
                    जिवंत ठेवण्या नाते,
                    उशिराने का होईना,
                      पावसाचे आगमन होई ……