Sunday, November 17, 2013

savali....

मे महिन्यातील दिवस असतात. ती माहेरी येते. कॉलनीत 
प्रवेश करता क्षणी तिला जाणवला ,तो थंडावा. ती वर पाहते.
कॉलनीतील दोन्ही बाजूंची झाडे उंचच उंच गेलेली असतात .
वारा आपल्याच मस्तीत वाहत होता. आणि त्यामुळे झाडांच्या
पानांच्या सळसळीतून एक प्रकारचा नाद निर्माण झाला होता.
दोन्ही बाजूने फांद्या एकमेकींशी हात गुंफून जणू काही फुगड्या 
खेळताना भासल्या. त्यांच्या फुगड्यामुळे  सूर्यकिरणांना रस्त्यावर
येण्यास वावच मिळत नव्हता. त्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्याला
थंडावा जाणवे. आणि अपसूकच मुखोद्गार बाहेर पडे,'खूप छान
वाटले .उन्हामुळे अंगाची लाही लाही झाली होती. '
               ती घरी पोहचते. घरासमोरील हिरवी  लॉन नि हिरवी
झाडे पाहून तिच्या डोळ्यांना आणखीनच थंडावा जाणवला . सकाळी
सकाळी पक्ष्यांची किलबिल कानावर पडली . ती लॉनवर आली .
वारा पिंगा घालत होता,तर फांद्या कधी फुगड्या तर कधी
झिम्मा खेळत होत्या. पानांची सळसळ,झाडांच्या फांद्यांना
भेदून धरेला भेटण्यास आतुरलेली कोवळी सूर्य किरणे  पाहून
तिच्या मनात एक आनंदाची लहर निर्माण झाली. सुख म्हणजे
तरी काय ?हेच असावे.
             तिच्या मनात आले,'आज तिच्या वडिलांना जावून
जवळजवळ १२ -१३ वर्षे झाली. त्यांनीच लावलेली हि झाडे
होती . जी मनाला शांत करत होती . '
          कॉलनीत  शिरतानाच तिला एखाद्या पवित्र स्थळाच्या
प्रथम पायरीचे दर्शन घेतल्याची भावना झाली . पवित्र ठिकाणी
गेल्यानंतर मिळणाऱ्या मनःशांती पेक्षाही जास्त मनःशांती येथे
मिळाली.
               संपूर्ण कॉलनीमध्ये झाडे लावून ती वाढवण्यास वडिलांनी
प्रोत्साहन दिले होते. घरासमोरील आणि आजूबाजूची काही झाडे
 खूप मेहनत करून त्यांनी वाढवली होती. वडील गेले तेव्हा ती झाडे
जास्त मोठी झाली नव्हती. पण आज त्या छोट्या झाडाचे मोठमोठ्या
वृक्षात रुपांतर झाले होते .
               तीच झाडे भर उन्हात स्वतः तळत होती. आणि इतरांना
गारवा देत होती. वडिलांना भेटण्याची तृप्ती तिला मिळाली. न कळत
प्रत्येकाच्या मनात एक आश्वासक साथीची गरज असते. तीच
आश्वासकता या झाडांच्या सावलीत तिला जाणवली. जणूकाही
झाडे तिला सांगत होती,'कडकडीत उन्हाची कशाला काळजी
करतेस?मी आहे न! तू फक्त आनंदी राहा…. '